Friday, October 20, 2017

६०व्या वर्षात पदार्पण करत असतानाच्या विशेषांकात प्रसिद्ध झालेले संपादकीय...  आपल्या आनंदाला उजाळा देण्याकरीता पुनः प्रकाशित करत आहोत.

 

सा. कल्याण नागरिक साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचे इतके वर्ष नियमितपणे प्रसिध्द होणारे कदाचित हे एकमेव साप्ताहिक आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी काही मोठी वर्तमानपत्रे वगळता छोट्या शहरातून प्रसिध्द होणारी स्थानिक पातळीवरची व ६० वर्षाचा पल्ला गाठणारी नियतकालिके ही बोटावर मोजण्याइतपतच असतील. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची आक्रमणे व मुंबईहून प्रसिध्द होणारे सर्व मोठ्या वर्तमानपत्रात ठाणे जिल्ह्यासाठी व कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेसाठी दररोज स्वतंत्र पाने देत असतांना स्थानिक स्वरूपाचे साप्ताहिक घालविणे ही एक प्रकारची तारेवरची कसरत असते.


व्यक्तीच्या जीवनात साठावे वर्ष लागणे म्हणजे प्रौढतेकडून ज्येष्ठतेकडे वाटचाल असते परंतु एखाद्या संस्थेसाठी किंवा वर्तमानपत्रासाठी किंवा वर्तमानपत्रासाठी साठावे वर्ष सर्वसामान्य वाचकांच्या विश्र्वासाची पोचपावती असते. सातत्याने व निष्ठेने एखाद्या छोट्याशा स्थानिक साप्ताहिकावर प्रेम करणारे काही हजारांनी लोकं असणे ही खरोखर त्या वृत्तपत्रासाठी अभिमानास्पद बाब ठरते. सा. कल्याण नागरिक कै. प. अ. घारे यांनी पाक्षिक स्वरूपी सुरू केले व पुढे आपल्या वयोमानामुळे कै. वा. ना. देवधर यांना हस्तांतरित केले. कै. देवधर यांनी या साप्ताहिकाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली व ब-यापैकी लोकाभिमुख केले तसेच पाक्षिक कल्याण नागरिकला साप्ताहिकाचे स्वरूप दिले. वयोमानानुसार कै. देवधर यांनी सा. कल्याण नागरिकच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात (२०००)हे साप्ताहिक बंद करण्याचा मनोदय ज्येष्ठ नेते प्रा. राम कापसे यांच्याकडे व्यक्त केला. प्रा. कापसे यांनी सा. कल्याण नागरिक सुरू रहाणे ही समाजाची आवश्यकता आहे असे सांगितले व मदतीसाठी सहाय्यक उपलब्ध करून देण्याचे आश्र्वासन दिले. सहाय्यक म्हणून पाच वर्षे काम करणा-याला. पुढील पाच वर्षांनी सा. कल्याण नागरिकची जबाबदारी पूर्णपणे देऊन टाकावी असे ठरले.त्यानुसार १ एप्रिल २००५ पासून सा. कल्याण नागरिकची जबाबदारी आमच्याकडे आली. इतक्या सहजतेने कै. घारे याजकडून कै. देवधर यांचेकडे व कै. देवधर यांजकडून आमच्याकडे सा. कल्याण नागरिक ज्या पध्दतीने हस्तांतरीत होऊ शकेल तेच या हिरक महोत्सव साजरा करणा-या सा. कल्याण नागरिकच्या यशाचे गमक आहे.

सा. कल्याण नागरिकचा हिरक महोत्सव प्रारंभ सोहळ जसा आयोजित करण्यात आला आहे तसेच वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मनोदय आहे. यामध्ये साहित्यिक, नाट्य क्षेत्रातील कार्यक्रम व सांगितिक कार्यक्रम याचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महानगर पलिकेच्या संदर्भात व इतर महत्वाच्या विषयात काही परिसंवादात्मक कार्यक्रम योजण्याचा आमचा मानस आहे. असे कार्यक्रम संपूर्ण वर्षभर सोयीनुसार घेण्यात येतील. याची आमच्या सुजाण वाचकांनी अवश्य नोंद घ्यावी तसेच याविषयी त्यांच्या काही कल्पना असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात किंवा दूरध्वनीद्वारे कळवाव्यात.

जशी सा. कल्याण नागरिकची व्याप्ती वाढली आहे. त्याचप्रमाणे त्याचा मित्र परिवारही वाढला आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आमची इथपर्यतची वाटचाल सोपी झाली आहे. कुठलेही वर्तमानपत्र चालविण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ खूप जरूरीचे असते. त्यासाठी आमच्या जाहिरातदारांनी वेळोवेळी आम्हाला मदतीचा हात पुढे केला आहे.

सा. कल्याण नागरीक आपल्या सर्वापर्यत पोहोचविण्याचे काम पोष्टखाते व पोस्टमन नियमितपणे व आपलेपणाने बजावतात.

सा. कल्याण नागरिकच्या  छपाईचे काम व ते पोस्टापर्यत नेण्याचे काम अक्षर मुद्रणाचे आपुलकीच्या नात्याने करीत असतात.

तसेच माजी आमदार श्री. प्रभाकर संत यांनी सुरू केलेल्या व सध्या त्यांचे चिरंजीव श्री. मनोज संत यांच्याकडून चालविल्या जाणा-या टिळक चौक येथील सरस्वती ग्रंथ भांडार येथे सा. कल्याण नागरिकच्या जनसंपर्क कार्यालयासारखी कामगिरी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता बजावत असतात. वय झाले तरी काही प्रमाणात घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याचे काम सर्वश्री आर. के. गुमास्ते व प्र. न. अत्रे निष्ठेने गेली अनेक वर्षे निभावत आहेत. सा. कल्याण नागरिकसाठी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लिखाणाचे काम अनेक कल्याणकर नागरिक नियमितपणे करीत असतात त्यामुळे आमच्या सुजाण वाचकांना विविध वाड्मयीन पर्वणी ठरते. सा. कल्याण नागरिकच्या हिरक महोत्सवी प्रसंगी सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व मित्रपरिवार तसेच अनावधानाने कोणाचा उल्लेख राहिला असेल तर त्यांचेही मन:पूर्वक आभार. लोभ आहेच, वृध्दिंगत व्हावा अशा अपेक्षांसह....

संपर्काची भाषा

Type in: