Friday, October 20, 2017

६०व्या वर्षात पदार्पण करत असतानाच्या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख...  आपल्या आनंदाला उजाळा देण्याकरीता पुनः प्रकाशित करत आहोत.


माणसाच्या आयुष्याचा कोणतातरी एक भाग सदैव भाग्याचे लखलखत असतो. खरंच माझ्या आयुष्यातील ‘आजी-आजोबा’ हा भाग सदैव तसाच होता आणि आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात हिमालयासारखे काम असणारे. सदैव आदर्श वाटावेत असे अनेक आजी-आजोबा मला मिळाले. राजकीय क्षेत्रात ‘अजातशत्रु’ असणारे रामभाऊ कापसे, वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असणारे डॉ. नाना गोगटे माझे आजोबा तसेच सदैव समजकारण करणारे, ‘कल्याण नागरिक’ सुरू करणारे प. अ. तथा परशुराम घारे हेही माझे आजोबा.

नाती कळायच्याही अगोदरच्या वयापासून मी त्यांना काका आजोबा म्हणूनच ओळखायची. मी लहान असतांना, काकू आजी आणि प्रभाकाकू घरात असली की मी त्यांच्या घरात मस्ती करायला, खाऊसाठी डबे चाचपायला जायचो. काकाआजोबा असले की काकू आजी हळूच सांगायची ‘काका आजोबा’ आहेत ?? बस्स ! अगदी शहाण्यासारखा वागायचो मी तेव्हा !  प्रथम त्यांचा धाक वाटायचा आणि मोठा झाल्यावर फक्त आदर !


तसे घारे मुळचे जमखिंडीचे ! तिथे घरदार आणि शेतजमीन होती. ते सात भाऊ आणि दोन बहिणी ! पुण्यात शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ पोष्टात नोकरी केली. पण तिथे आपल्या प्रगतीला वाव नाही म्हणून कल्याणला आले. मुंबईत नोकरी केली पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धंदा करायची इच्छा दाटून आली. मला कोणी बॉस नाही. मी बरोबर असेन तर बरोबरच आहे. दुसरे कोणी म्हणत असेल तर मी माझे म्हणणे बदलणार नाही ही मराठी लढवय्या वृत्ती ! जेष्ठ बंधू गोपाळराव घारे व त्यांनी मिळून कल्याण-भिवंडी मोटार सर्व्हिस सुरू केली. एस.टी. सुरू होईपर्यत ती चालू होती. त्याचबरोबर कल्याणमध्ये ‘मशिन लॉड्री’ सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. तोपर्यंत कल्याणचे कपडे धुवायला जायचे उल्हासनगरच्या धोबीघाटावर ! ही लॉड्री सुरू करण्यासाठी त्यांना नळाच्या पाण्याची गरज होती. हा काळ होता १९५० च्या आसपासचा ! कल्याणमध्ये तेव्हा होते विहीरीचे पाणी !  कल्याणकरांना न मिळावेत याचा पाठपुरावा करण्यास त्यांनी सुरवात केली. म्हणून मग नगरपालिकेचे कामकाज बघणे सुरू झाले.

काकाआजोबा हिंदू महासभेचे होते. काकू आजीकडून त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांशी नातेही होते. त्यांनी नगरपरिषदेची निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. पण त्या काळात १००० मते त्यांना मिळाली होती. आपण आपल्या मतदारांचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ‘कल्याण नागरिक’ ची सुरवात झाली. वा. शि. आपटे यांच्या सल्ल्यावरून त्यांनी त्याची सुरवात केली. कल्याण नगरपरिषदेच्या कामाची माहिती लोकांना व्हावी हाच निखळ हेतू त्यांनी हे पत्र सुरू करण्यामागे ठेवला होता.

१९५६ साली त्यांनी ‘कल्याण-सूची’ तयार केली ज्यामध्ये कल्याणचा इतिहास, कल्याणातील थोर व्यक्ती, निरनिराळ्या संस्था, व्यापारी इत्यादी माहिती होती. 2 लाख लोकसंख्येच्या कल्याणचा तो ‘Encyclopedia’ व होता म्हणाना !

त्याच काळात, फारसे न शिकलेल्या मराठी मुलांना स्वयंरोजगाराचे साधन मिळावे म्हणून सुभेदार वाडा. छबिलदास शाळा, दादर, कुर्ला  हायस्कूल येथे स्टोव्ह रिपेरिंग, सायकल रिपेरिंग असे वेगवेगळे कोर्स त्यांनी सुरू केले.

नंतरच्या काळात त्यांनी नाटकात कामे केली. काही नाटकांचे दिग्दर्शनही केले.

हाडाने ‘समाजसेवक’ असणारे काकाआजोबा उत्तम ‘वाहनचालक’ ही होते. कोणतीही गोष्ट मुळापासून करायची हा खाक्या असल्याने उत्तम ‘कार मेकॅनीक’ ही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन भारतरत्नांचा सारथी होण्याचे भाग्य त्यांना लाभले. ‘एक उत्तम वाहनचालक’ म्हणून प्रशस्तीपत्रके काकांना त्यांनी स्वत:हून दिली होती. सज्जनगच्या श्रीधरस्वामींचेही सारथी होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते.

सोनोपंत दांडेकरांच्या सहवासात आल्यावर त्यांनी बरीच वर्षे किर्तने केली व किर्तनशास्त्रावर एक पुस्तक लिहिले.

वयाच्या पंच्याहत्तरीला खूप धावपळ करणे शक्य नाही म्हणून कुटुंबियांच्या सल्ल्यावरून हे पत्र त्यांनी देवधर सरांना चालवायला दिले.

पंच्याहत्तरीच्या आसपास त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम करण्यास सुरवात केली. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी सीतारामशेट पै यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. नेतिवली, मलंगगड, अंबरनाथ येथील कुष्ठरोग्यांसाठी फराळ, कपडे जमविणे सुरू केले. त्यांना शासकीय मदत नीट मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. कुष्ठरोग्यांच्या कामाची दखल महाराष्ट्राचे राज्यपाल लतीफ यांनी त्यांना राजभवनावर बोलवून घेतली.

१९८४ मध्ये काकूआजी गेल्यावर ते खचले होते पण मुलगा ‘अरविंदकाका’ सून ‘प्रभाकाकू’ व मुलगी ‘सुमानआत्या’ यांच्या मदतीने त्यांनी ‘देवाघरचे देणे’ हे आत्मचरित्र लिहिले.

आज त्यांचा दुसरा मुलगा ‘कल्याण नागरिक’ साठ वर्षांचा ‘तरूण’ होतो आहे तर ज्येष्ठ पत्र अरविंदकाका त्याच्या पंच्याहत्तरीत, काकाआजोबांच्या पावलावर पाऊल ठेऊन पारनाक्याच्या महाराष्ट्र बँकेत लोकांना विनामूल्य मदत करत आहे. यासारखी समाधानाची गोष्ट ‘स्वर्गस्थ काकाआजोबांना’ दुसरी कोणती असू शकते ?

 

संपर्काची भाषा

Type in: