Friday, October 20, 2017

इतिहासाचा अभ्यास करतांना ‘लाट’ प्रणालीनेही विचार केला जातो. म्हणजे कालप्रवाहाच्या एकामागून एक येणा-या प्रचंड लाटा हेच परिमाण मानून सहस्त्रकांचा, शतकांचा, दशकांचा विचार करून, त्या त्या कालमर्यादेत जगात घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेतला जातो. तौलनिक अभ्यासाला ही प्रणाली फार सोईची असते. कल्याण शहराचा ह्या दृष्टीने विचार केला तर गेल्या सहा दशकांचा टप्पा आपणा सर्वसामान्य नागरिकांच्या आकलनात सुलभतेने येईल.

१९५० ते ६० ह्या दशकात कल्याणात, देशात आणि महाराष्ट्रात घडणा-या जवळजवळ सर्व चळवळीत कल्याणकर सहभागी होते. अगदी द्ष्काळग्रस्तांना मदत करण्यापासून, दरवर्षी पुराच्या पाण्याने वाताहात झालेल्या संसारांनाही हातभार लावायला, कल्याणीतील आबालवृध्द एकोप्याने सरसावत होते.  सर्व पक्षांचे अस्तित्व गावात असूनही गावपण हरवलेले नव्हते. पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद विसरून संकटकाळी एकमेका सहाय्य करू हा विचार प्रबळ होता.

मुंबईच्या छायेत वाढत असले तरी कल्याणकरांपुढे बकाल मुंबईपेक्षा शहर पुण्याचे उदाहरण होते. महाराष्ट्राते सर्व थरावरील नेतृत्व पुण्यात होते.


    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे केंद्र मुंबईकडे काही काळ झुकल्यासारखे वाटते. गिरणी कामगारांचा चळवळीतील प्रचंड वाटा लक्षात घेता ते नैसर्गिकही होते. ‘केसरी’ पेक्षा ‘मराठा’ प्रभावी होता. जयंतराव टिळक, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे ह्यांच्यापेक्षा आचार्य अत्रे, कॉ. डांगे, अमरशेख ह्यांचा जनमानसावर विलक्षण प्रभाव कल्याणकरांवर जास्त होता.

    बहुतेक वृत्तपत्रे, ह्या दशकात मत पत्रे झाली होती.

    ह्याचाच परिणाम कल्याणवर पण झाला होता. कॉ, कृष्णराव धुळपांचे निर्धार, जय महाराष्ट्र, जनसंघीयांचे ‘जागृती’ , ह्याच काळात कल्याणातून निघत होते. ह्या सर्वांचा जीव अगदी लहान होता. कोणत्याही क्षणी ही पत्रे बंद पडली असती त्याप्रमाणे ती पडलीच. अगदी ‘कुलाबा समाचार’ ची कल्याण पुरवणी प्रारंभी गणपतराव फडके आणि नंतर डॉ. मोडक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या संपादनाखाली निघे. तीही बंद पडली.

    पण ह्याच काळात नवल घडले. कल्याणच्या पत्रकारितेचा असा निराशेचा सूर असतांना कर्तृत्ववान नेते संपादन करीत असतांनाही ही निराशा होती.

    अशा काळात प. अ. घारे ह्या व्यक्तीला ‘कल्याण नागरिक’ सुरू करावे असे वाटणे हेच नवलाचे आहे. घारे अत्यंत सामान्य अवस्थेतले. ‘मोटर ट्रेनिग स्कूल’ वगैरे नाव ही न देता त्या काळात अनेक डॉक्टरांना, प्रतिष्ठितांना घारे यांनी कार चालवायला शिकवले. हे सारथ्य कर्म करत असतांनाच ते राजकीय चळवळीतही होते. किडकिडीत बांध्याचे, खाकी लांब ढगळ विजार आत खोचलेला शर्ट, वयाने आणि अनुभवाने परिपक्व असल्याची खूण म्हणजे माथ्यावर पांढरे शुभ्र केस आणि हातात बँग. हे घारे यांचे व्यक्तिमत्त्व.

    चाकावरच संसार होता म्हणून की काय त्यांच्या मनाची चाकेही फिरू लागली आणि पाहता पाहता त्यांचा ‘कल्याण नागरिक’ कल्याणात स्थिरावला.

    नगरपालिका वार्ता आणि नगरपालिकेच्या जाहिराती ह्यात चिमुकला अंक मर्यादित होता. घारे यांना स्वत:चे मत नव्हते असे नाही. ते स्वमताशी पक्के होते. पण ते कसलेले लेखक नव्हते. पेनपेक्षा पाने हाताळण्याचा बोटांना सराव. म्हणून कोणी हिणवले तरीही त्यानी नागरिकची कक्षा नगरपालिका वार्ता इतक्याच स्वरूपाची ठेवली. जाहिराती कमीच असणं आर्थिक बळशिवाय ह्या मर्यादा ओलांडणे कोणालाही कठीणच गेले असते.

    पण घारे यांनी चिकाटीने, पत्र चालूच ठेवले.

    स्वत:च मजकूर लिहिणे, प्रेसमध्ये नेणे, मुद्रण तपासणे आणि मुख्य म्हणजे वाटप करणे सगळं एकखांबी होते.

    वाढत्या वयाबरोबर ही कामे कठीण होऊ लागली आणि गुरूवर्य वा. ना. देवधरांकडे त्यांनी ‘कल्याण’ नागरिक सुपूर्द केले.

    शुभेदारवाडा हायस्कूलमधिल नावाजलेले शिक्षक, व्यवसाय म्हणून नव्हे तर काही ध्येय साधण्यासाठी त्यांनी स्वत:चे ‘देवधर क्लासेस’ सुरू केले होते. साधना मंडळाच्या माध्यमातूनही युवकांशी त्यांची जवळीक होती. निरलस, ध्येयवादी, कायम खादीधारी असलेल्या देवधर सरांचा जनसंपर्क अफाट होता.

    वसईहून कल्याणला ते आले ते रेल्वेतील नोकरीमुळे. पण वसईच्या त्यांच्या गुरूवर्यांचा वसा त्यांनी घेतला होता म्हणून ते शैक्षणिक क्षेत्रात आले आणि अत्यंत अल्पावधीत शिक्षक व समाजसेवक ह्या दोन्ही नात्यांनी कल्याणात ते स्थिर झाले.
    
    पण एक नवा वर्ग त्यांची वाट पाहत होता.

    कुठल्याच भिंती नसलेले. एकाच वेळी अनेकांचे प्रबोधन करणारे पत्र, ‘कल्याण नागरिक’ आपणहून त्यांचेकडे आले. प. अ. घारे यांच्या काळातील नगरपालिका वृत्तापलिकडे ‘कल्याण नागरिक’ ने कायापालट केला.

    छोट्या वृत्तपत्रांचा इतिहास त्यांना माहित होता.

    म्हणूनत कल्याणात धडपडणा-या सामाजिक संस्था, व्यक्ती यांना त्यांनी विशेष स्थान देण्यास सुरूवात केली. नगरपालिका वृत्त ते देतच होते. पण आता कल्याणातल्या विविध भागातील चळवळ्या व्यक्ती हुडकून त्यांनी त्या त्या भागातील उपक्रमांना एक प्रसिध्दीचे माध्यम दिले.
    कल्याणात अन्यत्र लिहिणारे प्रथितयश लेखक होते. त्यांना नागरिकमध्ये लिहिण्यास प्रवृत्त केले. प्रा. वा. शि. आपटे यांचेसारखे प्रख्यात, विद्वान लेखक ‘नागरिक’ आपले मानून लिहू लागले.
    नवनव्या व्यक्तींना त्यांनी लिहिते केले. ‘कल्याण नागरिक’चा आकार, प्रसिध्दी काळ पृष्ठमर्यादा हे लक्षात घेऊन ललित साहित्याला फारसा वाव ते देऊ शकत नव्हते.
    तरीही प्रासंगिक विषयावर अभ्यासू वाचकांकडून ते लिहून घेऊ लागले.प्र. न. अत्रे, सदाशिवराव जयवंत ह्या शहराच्या एका टोकाशी राहणा-या नागरी प्रश्नांची जाण असणा-यांना त्यांनी लिहावयास प्रवृत्त केले तर दुस-या टोकाला राहणा-या अण्णा बेटावकरांसारख्या अनुभवी पत्रकारांचे सहकार्य त्यांनी मिळविले.
    देवधर सरांची मते स्वच्छ आणि स्पष्ट होती. कोणत्याही, कितीही बड्या प्रस्थाच्या आहारी ते कधीच गेले नाहीत. राजकीय पक्षाचे ‘कल्याण नागरिक’ मुखपत्र होऊ नये इतकी काळजी ते घेत. पण त्यावेळी कोणत्याही पक्ष कार्यकर्त्यांने केलेल्या कार्याचे कौतुक करायला ते विसरले नाहीत.
    ‘समाज प्रबोधन’ हे उद्दिष्ट सतत समोर ठेवून, नव्या कल्पना, नवे उपक्रम, नव्या व्यक्ती त्यांचे कार्य यांना त्यांनी योग्य ती प्रसिध्दी दिली. सहाजिक जाहिराती कमी असूनही कल्याण नागरिकची सभासद संख्या वाढत गेली.
    देवधर सरांची धडपड सतत चालू होती. पण त्यांच्या शरीराची साथ तितकीशी नव्हती. क्लासेस तर त्यांनी बंद केले होते. प्रेस चालू होती. म्हणून सकाबसा अंक ते काढू शकत होते. पण अशा प्रकारे पत्र चालवणे त्यांच्या स्वभावात बसणारे नव्हते.
    पन्नास वर्षे पूर्ण करणारा ‘नागरिक’ बंद करण्याचा निर्णय क्लेशकारक होता. पण....
    कल्याण नागरिकच्या, कल्याणकरांच्या आणि देवधर सरांच्या सुदैवाने एक नवा धडाडीचा कार्यकर्ता पुढे आला – हेमल रवाणी. हा तरूण अनेक आव्हाने स्वीकारणारा. बालवयापासून सामाजिक कार्यात सर घेणारा. गुजराती मातृभाषा असलेले हेमल रवाणी वृत्तपत्रात वार्तांकन करतच होते. तरूण असले तरी अभ्यासू प्रत्यक्ष कार्यकर्ता या नात्याने कल्याण नागरिकशी त्यांचा संपर्क होताच. सुदैवाने त्यांची पत्नी इला रवाणी ह्याही सामाजिक कार्यात रस घेणा-या.
    ह्या दांपत्याला वाटले ‘कल्याण नागरिक’ आपण चालवावे. गावातल्या अनुभवी कार्यकर्त्यांचा सल्ला त्यांनी घेतला. आत्माराम द. तथा बाबा जोशी यांचेशी बोलणी केली. बाबा जोशींनी संपादकपदाची धुरा घेण्याचे मान्य केले. त्यांच्याच अक्षर मुद्रणमध्ये छपाई करण्याची व्यवस्था झाली.
    आणि देवधर सरांचा वसा ह्या त्रिमूर्तींनी घेतला.
    गेल्या चार-पाच वर्षात कल्याण नागरिकमध्ये झालेला बदल उल्लेखनीय आहे. वृत्तपत्र आणि मतपत्राचे एकरूपत्व हे ह्या पत्राचे वैशिष्ट्य झाले आहे. नगरपालिकेची महापालिका झाली. कार्यक्षेत्र वाढले. समस्या अधिक गहन होऊ लागल्या.सहाजिकच नगरसेवकांनाही मार्गदर्शन करण्याइतके अभ्यासपूर्ण लेखन नागरिकमध्ये येऊ लागले. नागरिकांच्या अडचणींना वाचा फोडणारे एक हक्काचे व्यासपीठ तयार झाले.     नवनवे विषय, महानगरांच्या विविध भागातील कामे. नगरसेवकांच्या चांगल्या कामाला दाद मिळू लागली.
    ह्या त्रिमूर्तींचा अफाट जनसंपर्क, सर्वांना जोडणारा स्वभाव आणि लेखणीबरोबर प्रत्यक्ष कामाची साथ यामुळे कल्याण नागरिक, महापालिकेच्या क्षेत्रात तर सर्वत्र पोहोचायचेच...पण जुने कल्याणकर कल्याण सोडून जिथे जिथे गेले तिथे कल्याण नागरिक जाऊ लागला.
    मी जेव्हा हेमलच्या आग्रहावरून ‘गोपाळकाला’ सदर शंभरावर अंकात लिहिले तेव्हा मला येणारे फोन, पत्रे यावरून मला कल्याण नागरिकच्या कक्षा किती विस्तारल्या आहेत याचा प्रत्यय आला.
    ‘कल्याण नागरिक’ च्या हीरक महोत्सवानिमित्त, नुसते प्रकाशिन नाही तर अन्य उपक्रमही उत्सव समितीने योजले आहेत.
    ‘कल्याण नागरिक’ हीरक महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

संपर्काची भाषा

Type in: