Friday, October 20, 2017

कल्याण नागरिक हे वार्तापत्र यावर्षी ६० वर्षे पूर्ण करीत आहे. कल्याण नागरिकचा देवधर सरांचा कालखंड मला अगदी खास स्मरणात आहे. कारण हे वार्तापत्र श्री. प. अ. घारे यांना ज्यावेळी सुरू केले त्यावेळी मी अगदीच लहान होतो पण देवधर सरांना ते वार्तापत्र चालविण्यास घेतल्यावर मात्र सरांचे आणि माझे अतिशय जिव्हाल्याचे संबंध असल्याने आम्हा अनेक विषयांवर चर्चा करत असू.
    माझे शालेय शिक्षण वसईत झाले आणि सरांचेही शालेय शिक्षण वसईतच झाले. त्यामुळे आम्हा  दोघांनाही वसईबद्दल वाटणारे आकर्षण आणि वसईच्या आठवणी आम्ही कितीतरी वेळा एकमेकांना सांगत असू. इयत्ता सातवीपर्यंत सरांचे शिक्षण कोकणात पालगड येथे पूज्य काने गुरूजींच्या चुलत्यांच्या घरात झाले. पण पुढे शिक्षणाची व्यवस्था तिथे नव्हती. आता पुढील शिक्षण कसे घ्यावे असा प्रश्न त्यांना पडला. पण नियतीची वेळापत्रके पूर्णपणे ठरलेली असतात. त्याच गावी त्यांना एक माहेरवाशीण, जी वसईच्या काण्यांची सून होती ती भेटली आणि तिने त्यांना वसईस येण्यास सांगितले. त्यामुळे पुढील शिक्षणाची व्यवस्था होईल याची त्यांना खात्री झाली. वसईस आल्यानंतर वेगवेगळ्या घरी वार लावून इदरभरणाची व्यवस्था झाली. वसईच्या निसर्गरम्य वातावरणात श्री परूळेकर सर यांच्या सहवासात, समाजवादी विचारसरणीच्या इतर व्यक्तिंच्या सहवासात सर अतिशय रममाण झाले. वसई त्यावेळी आगदी निसर्गरम्य, हिरवीगार आणि कोणालाही मोहात पाडील अशीच होती. त्यामुळे सर तिथे रमले तर नवल नाही.

 

याच काळात समाजवादी विचारसरणीचा एक निष्ठावान पुरस्कर्ता देवधर सर झाले. सामजवादी पार्टीचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना भेटल्यामुळे ते समाजवादाचे पुरस्कर्ते झाले. १९५१ साली सर वसईतच मँट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षण घेण्याची मनोमन इच्छा होती. शाळेचे शिक्षण कसेतरी पूर्ण केले, पण कॉलेजच्या शिक्षणाचे काय ? त्याचा खर्च कसा करणार ?
    अशा परिस्थितीत देवधर सरांचे गुरू श्री. परूळेकर सर यांनी त्यांना नोकरी करून शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. सरांनाही तो पटला. त्याकाळी मँट्रिक झालेल्या उमेदवारास सहजी नोकरी मिळत असे. सरांना वाटले रेल्वेत नोकरी करावी म्हणजे मुंबईतच शिक्षण करणे सहज शक्य होईल. पण, धडपड केल्याशिवाय मी तुला यश देणारच नाही असा जणू नियतीचा निश्चयच होता. रेल्वेत नोकरी तर मिळाली पण त्यांचे पोस्टींग चोळा पॉवर हाऊस, ठाकुर्ली येथे झाले. अनंत अडचणी त्यामुळे आता बहुधा खर्डेघाशीच आपल्या नशिबी आहे असे त्यांना वाटले असणार आणि ठाकुर्लीच्या पॉवर हाऊसमध्ये त्यांची नोकरी सुरू झाली. पण नोकरीत मन रमणे किंवा नोकरीत राहणे त्यांच्या स्वभावात नव्हते. तशाही परिस्थितीत त्यांनी इंदूरला जाऊन इंटरची परीक्षा दिली आणि ते पुढे पदवीधर झाले. पण १९५१ साली मँट्रिक झालेल्या या गुणी विद्यार्थ्यास ग्रँज्युएट होण्यास १९६१ साल उजाडले !
    योगायोगाने ठाणे स्थानकावर त्यांना दापोलीच्या शाळेत शिक्षक असलेले श्री. र. वी. सोमण भेटले. देवधर सरांनी मला शिक्षक व्हायचे आहे असे त्यांना सुचविले. त्यावेळी सोमण सर ठाण्याच्या शाळेत होते. परंतु त्यांनी कल्याणच्या सुभेदार वाड्यात जाण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे देवधर सरही कल्याणला सुभेदार वाड्यामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस लागले. यामुळेच श्री देवधर सरासारखी एक सौजन्यमूर्ती कल्याणला लाभली.
    ह्या शाळेमध्ये त्यावेळी आपटे मँडम शिक्षिका होत्या. तारूण्यसुलभ अशी एकमेकाबद्दल नाजुक भावना दोघांच्याही मनात रूजली आणि त्याचे रूपांतर प्रेमविवाहात झाले, पत्रिका पाहूनही मिळणार नाही अशी कर्तव्यतत्पर, पतीच्या प्रत्येक कृतीस पाठिंबा देणारी अशी पत्नी त्यांना लाभली हे जणू नियतीने त्यांच्या धडपडीस दिलेले गोड फळ होते असेच मनात येते.
    पण शाळेच्या शिक्षकाच्या नोकरीतही त्यांचे मन रमेनासे झाले. कारण विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना येणारी वेळेची बंधने आणि वरिष्ठांची होणारे मतभेद या सा-या गोष्टींचा त्यांना उबग आला आणि त्यांनी नोकरीचे बंधन झुगारून देवधर क्लासेसची १९६४ साली स्थापना केली. याच काळात त्यांच्या संसार वेलीवर दोन सुंदर फुलं उमलली. सौ. गीता आणि श्री गिरीश ही त्यांची दोन्ही सुविद्य मुलं त्यांच्यासारखीच विनयी आहेत. पैसा मिळविणे हे ध्येय त्यांनी  कधीच ठेवले नव्हते. त्यामुळे कितीतरी आर्थिक अडचणी असलेले विद्यार्थी त्यांच्या क्लासमध्ये अक्षरश: ज्ञानाचे ‘दान’ घेत होते. त्यावेळी आमची आर्थिक परिस्थितीही हालाखीचीच होती. पण त्यामुळेच देवधर सरांसारख्या देवमाणसाचा सहवास मला लाभला. क्लासमध्ये हा विद्यार्थी फुकट शिकतो आहे म्हणून मला किंवा माझ्या भावंडांना कधीही वेगळी वागणूक मिळाली नाही. उलट वसईच्या गांगलांचा नातू म्हणून मला त्यांचे जास्तच प्रेम मिळाले.
    ह्या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाछी धडपड हे पाक्षिक तसेच पालकांच्या प्रबोधनासाठी पालक प्रबोधन या सारखी पाक्षिके त्यांनी सुरू केली. विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास नियमितपणे आणि शिस्तबध्दपणे होत नाही ही अडचण लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली. जे जे म्हणून विद्यार्थ्यांसाठी करता येणे शक्य होते ते सर्व प्रयत्न देवधर सर अखेरपर्यत करीत होते.
    कल्याण नागरिकचे संपादक झाल्यावरही त्यांनी ही धडपड सोडली नाही. उलट कल्याण नागरिकमार्फत त्यांनी समाजप्रबोधनाचे व्रत घेतले. अतिशय स्पष्ट पण मृदू भाषेत नेमके विषय मांडणे ही त्यांची हातोटी होती. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लेख लिहिले. अनेक नवीन लेखकांना विचार मांडण्याची संधी त्यांनी कल्याण नागरिकमध्ये दिली. त्यांचा कल्याण नागरिकचा दिवाळी अंक नेहमीच वाचनीय होऊ लागला.
    आज कल्याण नागरिक हीरक महोत्सव साजरा करताना आम्हा देवधर सरांची उणीव पावलोपावली जाणवणार आहे. तरीपण ज्या व्यक्तींच्या हाती त्यांनी कल्याण नागरिकची सूत्रे दिली ते श्री. आत्माराम जोशी आणि श्री. हेमल रवाणी हे दोघेही सरांचे कार्य निश्चितच समर्थपणे करतील याबद्दल शंका नाही.
    कल्याण नागरिकच्या हीरक महोत्सवानिमित्ताने अविरतपणे धडपड करणा-या श्री देवधर सरांना माझी नम्र आदरांजली.

संपर्काची भाषा

Type in: