Friday, October 20, 2017

सा. कल्याण नागरिकच्या प्रकाशनाला ६५ वर्षे पूर्ण होऊन आता ६६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.  हे केवळ शक्य झाले आहे ते वाचकांच्या निस्सीम प्रेमापोटी.  व्यक्तीने वार्धक्यात प्रवेश केल्यानंतर शरीराचे वेगवेगळे अंग हळूहळू निष्क्रीय होण्यास सुरूवात होत असते.  सा. कल्याण नागरिक मात्र दिवसेंदिवस तरूणपणाकडे वाटचाल करीत असताना दिसत आहे.  वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे सा. कल्याण नागरिकच्या सभासदांची संख्या दर आठवड्याला वाढत चालली आहे.   वाढत्या वाचकांच्या संख्येमुळे आपोआपोच जाहिरातींची संख्या पण चांगली वाढली आहे.  त्यातून दर महिन्याला एक रंगीत विशेषांक प्रसिद्ध करण्याची कल्पना अंमलात आणली गेली.  रंगीत विशेषांकाबरोबरच प्रत्येक विशेषांक हा विशिष्ट विषयाशी निगडीत असावा असा प्रयत्न झाला व त्याला खूपच चांगला प्रतिसाद वाचकांनी दिला आहे.  अशा विशेषांकाद्वारे आपल्या शहरात एक चांगली चर्चा घडवून आणावी व अभिजनांकडून सर्वसामान्य वाचकांचे प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा या विशेषांकामागची आहे.  

कै. वा. ना. देवधर यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यापुढे ठेऊन सा. कल्याण नागरिकची वाटचाल पुढे सूरू आहे.  सा. कल्याण नागरिकच्या माध्यमातून एरव्ही लेखन करण्याच्या फारश्या भानगडीत न पडणा-या अभिजनांना लिहिते करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे आम्ही केला आहे.  तो तसाच सुरू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सतत केला आहे.  त्यामुळेच कल्याण नागरिकमध्ये विविध विषयांवरचे लेख आजपर्यंत देऊ शकलो.  या माध्यमातून विविध विचारांची देवाणघेवाण होत राहिली आहे.

गेल्या पंधरा वीस वर्षात वर्तमानपत्रे व एकूणच माध्यमांमध्ये आमुलाग्र फेरबदल झालेले आपल्याला दिसतात.  कल्याण शहर हे मुंबईलगतच असल्यामुळे बदलाचे वारे आपल्याकडे अगोदरच जाणवायला लागतात.  प्रिंटमिडिया (वर्तमानपत्रे) मध्ये वाढलेल्या स्पर्धेने वाचकांना जास्तीत जास्त पाने, ती ही रंगीत देण्याची सुरूवात झाली.  त्याहून पुढे जाऊन मग मुंबईहून प्रसिद्ध होणा-या मोठ्या वृत्तपत्रांनी जिल्हा स्तर आणि महानगरपालिका स्तरावरच्या दैनिक पुरवण्या नेहमीच्या वृत्तपत्रात देण्यास सुरूवात केली.  उदा. ठाणे वृतांत, कल्याण-डोंबिवली वृतांत, मीरा-भायंदर वृतांत, मुंबई उपनगर वृतांत इत्यादी.  त्यामुळे स्थानिक स्तरावर व जिल्हास्तरावर चालणा-या वर्तमानपत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.  आता स्थानिक वृत्तपत्रांची प्रोप्रायटरी संपली की काय ?  असाही प्रश्न विचारला जाऊ लगाली.  काही स्थानिक छोटी वृत्तपत्रे व साप्ताहिके बंदही पडली.  परंतु दर्जेदार व समाजाचा ज्यांनी विश्वास संपादन केला होता अशा वृत्तपत्रांवर व साप्ताहिकांवर याचा परिणाम झाला नाही.  मुंबईच्या अगदी लगत असलेल्या ठाणे शहरात रोज पाच ते सहा दैनिके प्रसिद्ध होतात.  मात्र कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सुजाण वाचकांची प्रथम पसंती ठरलेला आपला सा. नागरिक देखिल या सर्व परिस्थितीवर मात करीत टिकून तर राहिलाच आहे तसेच अधिकाधिक खुलत गेला आहे.

वर्तमानपत्र हातात घेऊन वाचणे आता नविन पिढीच्या तरुणांना हल्ली आवडत नाही.   त्यामुळेच सर्व मोठ्या वृत्तपत्रांनी आपली वेबसाईट सुरू करून इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून वर्तमानपत्रे वाचण्याची सोय केली आहे.  अशीच सोय आजपासून सा. कल्याण नागरिकने आपल्या वाचकांसाठी सुरू केली आहे.  ह्यापुढेही वेबसाईटमार्फत नवीन नवीन प्रयोग आम्ही करत राहू.  आपल्या या वेबसाईटबद्धलअपेक्षा काय आहेत त्या आम्हाला जरूर कळवा.

संपर्काची भाषा

Type in: